-: प्रासंगिक लेख:- -शिकूया सारे, शिकूया ऑनलाईन: शिक्षक आणि ग्रंथपालांचे सामूहिक प्रयत्न-


-: प्रासंगिक लेख:- 
-शिकूया सारे, शिकूया ऑनलाईन: शिक्षक आणि ग्रंथपालांचे सामूहिक प्रयत्न-

आज संपूर्ण विश्वावर विषाणू रुपी संकटाचे सावट पसरले असून या संकटातून पार पडण्यासाठी अनेक क्षेत्रातील व्यक्ति आप-आपल्या परीने योगदान देत आहे. शैक्षणिक क्षेत्र सुध्दा यापासून विभक्त राहिलेले नाही. ज्याप्रकारे वैद्यकीय सेवा, पोलीस दल, स्वच्छता विभाग इ. क्षेत्रातील कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती सुध्दा या परिस्थितीत आपले योगदान देत आहे. शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत विचार केला असता सध्याच्या या विपरीत परीस्थितीत विद्यार्थी व पालकवर्ग हे शिक्षण संबंधीत अनेक प्रश्नांनी अस्वस्थ जाणवत आहे. अशा वेळी त्यांच्या प्रश्नांचे निरसन करून त्यांना मानसिकदृष्ट्या स्वस्थ ठेवणे अतिमहत्वाचे आहे. संकटाच्या या काळात विद्यार्थ्यांना परीक्षा, प्रकल्प, प्रात्यक्षिक, रोजगार अशा विविध बाबींची चिंता भेडसावत असून या चिंतेपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी अनेक शिक्षक आणि ग्रंथपाल हे मोलाचे योगदान देतांना दिसत आहे.  कुठलेही महत्वाचे कार्य थांबू नये म्हणून जसे अतिमहत्त्वाच्या सेवेत असणारे कर्मचारी हे घराबाहेर राहून देशसेवा करीत आहे, त्याचप्रमाणे घरात राहूनच अनेक शिक्षक आणि ग्रंथपाल हे आपल्या कार्याने विद्यार्थी व पालकांना मानसिक बळ देत आहे. 

आज अनेक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले आहे. ग्रंथपालांव्दारे देखील अनेक शैक्षणिक आणि अवांतर वाचनीय ई-संसाधनांना वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, ई-मेल व्दारे, व्हिडीओ कॉन्फेरेन्सिंग व्दारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. ई-संसाधनांच्या मदतीने विद्यार्थ्यांना शालांत परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, स्पर्धा परीक्षा, आगामी काळात होणाऱ्या मुलाखती इत्यादींच्या तयारीसाठी कुठल्याही संदर्भ साधनांची कमतरता भासू नये हा या कार्यामागील प्रमुख उद्देश आहे. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागविण्यात ज्या शैक्षणिक संसाधनाचा उच्च शिक्षणात तसेच शालेय शिक्षणात मोठ्या प्रमाणात वापर होत आहे त्यामध्ये केंद्र शासनाच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालय यांच्या पुढाकाराने व देशांच्या मोठमोठ्या शैक्षणिक संस्था उदा. आय.आय.टी, यु.जी.सी, इनफ्लीबनेट, एन.पी.टी.ई.एल, बालभारती इत्यादींच्या सहभागातून भविष्याचा विचार करून अगोदरच तयार केलेल्या वेगवेगळ्या ई-उपक्रमाचा  सिंहाचा वाटा ठरत आहे.     

IMG Source Reference:- https://www.google.com/url?-sa=i&url=https%3A%2F%2Fdigitalmarketinginstitute.com

विद्यार्थ्यांना कसे मिळते ऑनलाईन मार्गदर्शन:-शालेय स्तरापासून तर महाविद्यालय व विद्यापीठ स्तरापर्यंत अनेक संस्था विविध पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असून यांसाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. व्हिडीओ कॉन्फेरेन्सिंग साठी उपलब्ध असलेल्या झूम सारख्या ऍपप्लिकेशनचा उपयोग करून व्हर्च्युअल क्लासरूम व्दारे, व्हिडीओ कॉन्फेरेन्सिंग, फेसबुक लाइव्ह, व्हाॅटसअप ग्रुप, ई-मेल, वेबिनार, मोबाईल किंवा फोनवरून प्रत्यक्ष संवाद अशा विविध माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना विशिष्ठ घटकांबद्दल, मुद्यांबद्दल, विषयांबद्दल, अडचणींबद्दल शिक्षकांद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. केवळ शैक्षणिक माहितीच नव्हे तर विद्यार्थी आणि पालक यांचे समुपदेशन देखील केले जात आहे. विद्यापीठ, अभ्यास मंडळ, विद्यापीठे, केंद्र व राज्य सरकार यांच्या वतीने वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांची देखील माहिती या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. आज शिक्षक हे फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आपल्या पाल्यांसाठी चिंतीत असलेल्या पालकांचे सुध्दा मनोधैर्य वाढवतांना आणि मार्गदर्शन करतांना दिसत आहे.

ग्रंथाचे महत्व:- काळ बदलला, युगे बदलली मात्र आजही "ग्रंथांची महीमा अविरत आहे" याची प्रचिती आज आपणास प्रत्येक घरात पहावयास मिळत आहे. घरा-घरात फक्त विद्यार्थीच नव्हे तर त्यांचे पालक सुद्धा या वेळी ग्रंथांचा आधार घेतांना दिसत आहे. कुणी आपला छंद जोपासण्यासाठी, कुणी अधिक ज्ञानप्राप्तीसाठी, कुणी आध्यत्मिक ज्ञानप्राप्तीसाठी तर कुणी मनोरंजनासाठी कथा, कादंबरी, शब्दकोश, धार्मिक ग्रंथ, मासिके, विनोदी कथा अशा विविध ग्रंथसाहित्यांचा वापर करीत आहे. यासाठी शिक्षक आणि ग्रंथपालांव्दारे वेळोवेळी पाठविण्यात येणा-या आधुनिक ई-संसाधनांचा तसेच स्वत:च्या संग्रहातील वाचन साहित्याचा देखील मोठ्या प्रमाणात वापर होतांना दिसत आहे.  

ग्रंथपालांचे योगदान:- ग्रंथालय हे शिक्षक, विद्यार्थी, संशोधक आणि वाचक यांच्या ज्ञानप्राप्तीचा मुख्य दुवा आहे. परंतु आज प्रत्यक्ष ग्रंथालयात जाऊन ग्रंथसाहित्यांना हाताळणे शक्य नसल्यामुळे ग्रंथालयातील ज्ञानसंसाधनांना प्रत्यक्ष घरा-घरापर्यंत पोहचवून अनेक ग्रंथपाल बंधू भगिनी “ज्ञान गंगा घरोघरी” या उक्तीला सार्थ ठरविण्याचे कार्य करीत आहे. एकीकडे आपण पाहिले की विविध आधुनिक माहिती संसाधनाचा वापर करून शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे. परंतु कुठेतरी याला एक मर्यादा आहेच म्हणून सखोल मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांना संदर्भग्रंथ, पाठ्यपुस्तक, शैक्षणिक संसाधने तर संशोधक असल्यास त्यांना शोधनिबंध, नियतकालीके, शोधप्रबंध इत्यादी संसाधने व सामान्य वाचक असल्यास अवांतर साहित्यांची पुस्तके अशा विविध बाबींची आवश्यकता भासते आणि इथूनच ग्रंथपालांचे खरे कार्य सुरु होते. अनेक ग्रंथपाल अत्यंत मेहनतीने ग्रंथालयातील ग्रंथसाहित्यांना आधुनिकतेची जोड देऊन ऑनलाईन पद्धतीने सर्वासाठी खुले करीत आहे आणि तीच मेहनत या संकटाच्या काळात आपल्या सर्वांच्या कामी पडतांना दिसते. ग्रंथपालांच्या याच कार्यामुळे ग्रंथ आणि ग्रंथेत्तर साहित्य हे घरोघरी उपलब्ध करून देण्यात कुठलीही अडचण उद्भवताना दिसत नाही.

ग्रंथपालांव्दारे कुठली संसाधने उपलब्ध करून देण्यात येत आहे:- शालेय स्तराचा विचार केला तर बालभारती सारख्या विविध संकेतस्थळाची उपलब्धता करून देण्यात येत असून अनेक कविता, कादंबरी, प्रश्नमंजुषा आणि सेल्फ लर्निंग ऍप्लिकेशन उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर या कार्यात जास्त कस लागतांना दिसतो. या स्तरावरील विद्यार्थ्यांना लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, वेब पोर्टल, संकेतस्थळ, मोबाईल ऍप् यांसारख्या माहिती संसाधनाचा उपयोग करून व्हिडिओ लेक्चर्स, प्रात्यक्षिकांचे व्हिडीओ, प्रश्नपत्रिका, संदर्भग्रंथ, नियतकालिके, मागील प्रश्नपत्रिका, संशोधन प्रकल्प, शोधनिबंध, वर्तमानपत्रे इत्यादी उपलब्ध करून दिली जात आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयात उपलब्ध असणारे विविध डेटाबेस उदा. डेलनेट. एन.लिस्ट. जे-गेट, स्प्रिंगर, एल्सवियर यांची उपलब्धता करण्यात येत आहे. तसेच मानव संसाधन आणि विकास मंत्रालय,भारत सरकार यांच्या पुढाकाराने व देशांच्या मोठमोठ्या शैक्षणिक संस्था उदा.आय.आय.टी, यु.जी.सी, इनफ्लीबनेट, एन.पी.टी.ई.एल यांच्या सहाय्याने निर्माण करण्यात आलेल्या मुक्त ई-संकेतस्थळाची लिंक देखील पाठविली जात आहे. यात मुख्यत: नॅशनल डिजिटल लायब्ररी (NDL), ई-पीजी पाठशाळा, ई-शोध सिंधू, शोधगंगा, शोधगंगोत्री, स्वयम :(मुक्स कोर्सेस), स्वयमप्रभा (३२ चॅनेल डिटीएच) वाहिनी,  सीईसी-युट्यूब चॅनेल, विद्वान डेटाबेस अशा विविध संस्थांचा समावेश होतो.              

समुपदेशकांचीही मुख्य भूमिका:- "भूतो ना भविष्यती" अशी वेळ आज आपल्या समोर आली असून यात लहान मुलांपासून तर वयोवृध्दांपर्यंत सर्वच व्यक्ती त्रस्त जाणवत आहे. कुणाला रोजगाराची, कुणाला घर चालविण्याची, कुणाला शारीरिक समस्येची तर कुणाला भविष्याची चिंता भेडसावत आहे. तर कुठे पालक आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगती बद्दल चिंतेत जाणवत आहे. या सर्वांचा विचार करून शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे यांच्या वतीने तज्ञ समुपदेशकांची मदत घेऊन पाल्य व त्याचसोबत पालकांचे देखील समुपदेशन केले जात आहे. जेणेकरून त्यांची मानसिक चिंता कमी करता येईल आणि सकारात्मकतेने या परीस्थितीला सामोरे जाण्यास मदत होईल,              

निष्कर्ष:- या सर्व बाबींचा विचार केला असता असे जाणवते की आज उद्भवलेल्या परिस्थितीत शिक्षक, ग्रंथपाल, क्रीडा शिक्षक आणि समुपदेशक हे सर्व मिळून घरात राहूनच समाज प्रबोधन करीत असून या कार्यासाठी आधुनिक माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर केला जात आहे. या कार्यामुळे आजच्या परिस्थितीतून बाहेर निघण्यास सकारात्मक प्रेरणा तर मिळतच आहे परंतु हा अनुभव आपल्या देशाच्या शिक्षण पद्धतीला भविष्यात एक नवी दिशा देखील देईल हे निश्चित आहे. सर्व विद्यार्थी व पालकवर्ग देखील शिक्षक आणि  ग्रंथपालांच्या मेहनतीला प्रतिसाद देवून समाजात “ज्ञानाची ज्योत” अविरत पेटवून ठेवतील ही आशा करतो. 

-:लेख:-


                            हितेश गोपाल ब्रिजवासी                        
-ग्रंथपाल- 
-विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत, के.ए.के.पी.संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जळगाव-


Artificial Intelligence कुत्रिम बुद्धीमत्ता संदर्भातील काही महत्व पूर्ण लेख

Artificial Intelligence कुत्रिम बुद्धीमत्ता संदर्भातील काही महत्व पूर्ण लेख  

-: प्रासंगिक लेख:- -शिकूया सारे, शिकूया ऑनलाईन: शिक्षक आणि ग्रंथपालांचे सामूहिक प्रयत्न-