माणुसकीचा झरा : एका ग्रंथपालाचा जीवन प्रवास
पद, पैसा आणि प्रतिष्ठा अशा कुठल्याही मोहात न पडता अतिशय प्रामाणिकपणे निरंतर कार्य केले. सर आपण आमच्या सारख्या तळागाळातील विद्यार्थ्यांना ग्रंथालयशास्त्रात आणून आमचे एक अस्तित्व निर्माण करून दिले सर.
सन २००६ साली आपल्या मार्गदर्शनात कमवा शिका योजनेत कार्यास सुरवात झाली. तेव्हा पासूनच आपल्या कार्यातील तळमळता आणि एक निष्ठता पहायला मिळाली.
अत्यंत तुटपुंज्या पगारात देखील रोज ८० ते १०० कि. मी चा प्रवास खिश्यात पैसे नसले तरी मिळेल ते वाहन ट्रक, ट्रॅकटर तर
कित्येक मोटारसायकल वाल्यांना हात दाखवून लिफ्ट मागून पूर्ण करायचा पण कसे ही करून कामावर हजर व्हायचं ही जिद्द होती.
अतिशय ग्रामीण भागात (पारोळा) जिथे ग्रंथालयशास्त्र विषयांत करीयर घडविणे असा विचार स्वप्नात देखील कित्येकांना येत नसेल, त्या ठिकाणाहुन पदव्युत्तर शिक्षण घेऊन आलेला एक युवक कुठलीही ओळख नसतांना जळगांव शहरांतील एका नामांकित संस्थेत (IMR, Jalgaon) अचानक येऊन भेटतो काय... आणि सर नोकरी मिळेल का?अशी विचारणा करतो काय..!
एक अनोळखी व्यक्ती ती ही ग्रामीण भागातून एवढ्या मोठ्या संस्थेत कुठल्याही ओळख आणि वशिल्याशिवाय काम मागत आहे. हे पाहून कदाचित नियतीने आणि काही सत्कर्मी लोकांनी त्यांना ही संधी बहाल केली. म्हणतात ना 'प्रयत्नांती परमेश्वर' आणि येथूनच स्वकर्तृत्वावर रोजगार प्राप्त करून ग्रंथालयशास्त्रातील कार्याची सुरुवात झाली. कपाटांची अव्यवस्था, पुस्तकांची विखुरलेली मांडणी आणि हाताशी कुठलाही सहकर्मी नाही अशा परिस्थितीत आपल्या मेहनतीने एक सुशोभित ग्रंथालयाची रचना करण्यास आरंभ केला त्यांची ही चिकाटी पाहून संस्थेने देखील त्यांना हळूहळू शक्य होईल ती सर्व संसाधने आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. फार कमी वेळातच एक सुस्थितीतील ग्रंथालयाची रचना सरांनी करून दाखविली. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या (MBA, MCA)
विद्यार्थी आणि शिकांमध्ये देखील ग्रामीण बोली आणि ग्रामीण राहणीमान अभिमानाने जपत सरांनी आपले कार्य सुरू ठेवले, कालांतराने बी.लिब आणि एम.लिब च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरवात केली अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडविले त्यातलाच मी एक अणि याचा मला अभिमान आहे.
कुणाला अगदी मनापासून आणि ईमानदारीने द्यायचे ठरवले की, त्यासाठी गर्भश्रीमंती लागत नाही. लागते ती फक्त मनाची श्रीमंती आणि तीच श्रीमंती सरांकडे होती. कुणाला घडविण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी खूप विद्वत्ता असलीच पाहिजे असे देखील नसते स्वानुभवच सर्वात महत्वाचा असतो हे सरांनी दाखविले. कुठलेही डॉक्टरेट नाही किंवा कुठलेही डी.लीट नाही पण तरी देखील ग्रंथालय व्यवस्थापनातील बारकावे आणि जीवन जगण्याची कला मी सरांकडून शिकलो. सरांनी देखील अगदी मनमोकळेपमाणे त्यांचा सर्व अनुभव आम्हाला शिकविला.
माझे ग्रॅज्युएशन(BBM) पूर्ण होत असल्याने आता कमवा शिका योजनेमधील नोकरी देखील मला सोडावी लागणार होती. मी ही परिस्थितीने फार काही उत्तम नव्हतो व ही बाब सरांना चांगली ठाऊक होती. परंतु नोकरी सोडणे भागच होते. मी लागलीच एका खाजगी संस्थेत रुजू झालो. पण का कुणास ठाऊक मी ग्रंथालय क्षेत्रातच कार्य करावे असे त्यांचे स्वप्न होते. कदाचित त्यांनी माझ्यात ग्रंथालय क्षेत्राप्रती असलेली आपुलकी ओळखली असावी. एका दिवशी सरांचा मला अचानक फोन आला त्यांनी मला सांगितले की, तुझा प्रवेश मी बी.लिब या वर्गात केला आहे व त्याचा शुल्क देखील मी भरला आहे तू फक्त कागदपत्रे जमा करून दे.
मी अचानक गोंधळलो कारण फिस आठ हजार रुपये इतकी होती. इतके पैसे माझ्याकडे नव्हते आणि सरांचाही तेवढा आवाका नव्हता मी त्यांना विचारले सर आपण अस का केले? आणि ही फिस कुणी दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला ग्रंथपाल म्हणून पहाण्याची माझी इच्छा आहे. नंतर मला कळाले की, सरांनी भरलेले पैसे हे त्यांच्या घरातील किराणा सामानासाठी असलेले पैसे होते. ऐकूण खूप भारावलो, रक्ताचं नातं नसतांना देखील कुणी अस कसे करू शकतो यांवर विश्वास बसत नव्हता. मी ही सरांच्या त्या शब्दाचा मान ठेवून मिळालेली नोकरी सोडून कमी पैशाने ग्रंथालयात सहाय्यक म्हणून काम सुरू केले आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी आज ग्रंथपाल होऊ शकलो...
या क्षेत्रात मी केलेले कार्य ही त्यांचीच प्रेरणा होती आणि राहील. खंत मात्र एवढीच आहे की, दुसऱ्यासाठी झिजणाऱ्या या परिसाचे जीवन मात्र सोन्यासारखे होऊ शकले नाही.
अजून खूप काही करायचे होते, अनेक स्वप्न त्यांनी स्वतः आणि माझ्या करीयरसाठी पाहिली होती. विनाअनुदानित संस्थेत कार्यरत असतांना देखील मनाने श्रीमंती असलेला हा अवलिया आज कित्येकांच्या मनात आपले घर करून गेलाय.
हसरा चेहरा आणि जे होईल ते पाहून घेऊ..! असा आत्मविश्वास हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्ये होते. आपल्या आत्मविश्वासाने त्यांनी कोविड-१९ वर देखील मात केली.
आजही कुठलीही अडचण आली तर एका मोठ्या भावाप्रमाणे ते मला समजवत आणि चुकलो की रागवत देखील. माझ्या प्रत्येक यशाचा त्यांना माझ्या पेक्षा जास्त आनंद होत.
परंतु आज दुर्दैवाने त्यांपेक्षा कितीतरी पटीने ते दुःख सोडून गेले. पाठीमागे आपली अर्धांगिनी एक निरागस मुलगा आणि लहानशी एक चिमणी असा परिवार आहे सरांचा.
पुढे कस होईल याची कल्पना देखील केली जात नाही. असा क्रूर कहर नियतीने का केला कुणास ठाऊक. पण जे घडले त्यावर विश्वास होत नाही. जणू एक निखळ पाण्याचा आंनददायी झरा अचानक कोरडा पडल्या सारख झालंय मात्र
माझ्यासारख्या कित्येकांच्या मनात वाहणारा हा माणुसकीच्या झरा निरंतर वाहत राहील.
माझ्या लेखणीचा त्यांना खूप अभिमान होता. परंतु आज त्यांच्याबद्दल लिहितांना मला अतिशय दुःख होत आहे, जणू प्रत्येक शब्द एक अश्रू म्हणून डोळयातून पडत आहे..
सर आपण आमच्यासाठी इतके काही केले. परंतु आम्ही आपल्यासाठी काहीच करू शकलो नाही याची खंत आयुष्यभर मनात राहील.
कळत न कळत काही चुका झाल्या असतील तर क्षमा असावी सर...🙏🏻🙏🏻🙏🏻
*भावपूर्ण आदरांजली सर....*💐💐💐💐💐💐 😭😭😭😭😭😭😭😭
आपला
हितेश
Artificial Intelligence कुत्रिम बुद्धीमत्ता संदर्भातील काही महत्व पूर्ण लेख
Artificial Intelligence कुत्रिम बुद्धीमत्ता संदर्भातील काही महत्व पूर्ण लेख

-: प्रासंगिक लेख:- -शिकूया सारे, शिकूया ऑनलाईन: शिक्षक आणि ग्रंथपालांचे सामूहिक प्रयत्न-
-
-: प्रासंगिक लेख:- -शिकूया सारे, शिकूया ऑनलाईन: शिक्षक आणि ग्रंथपालांचे सामूहिक प्रयत्न- आज संपूर्ण विश्वावर विषाणू रुपी संकटाचे...
-
-जागतिक योग दिवस- International Yoga Day योग: कर्मसु कौशलम् Yog Sadhna / योग साधना. ‘योग साधना’ ही आपल्या देशाने जगाला व...
-
कार्यक्रम बातमी कार्यक्रमाची - Video Link ग्रंथालय भारती विशेषांक - ऑगस्ट ९, २०२५ - वाचण्यासाठी येथे क्लिक करावे