नमस्कार,
आज जागतिक पुस्तक दिन. अनेकांना असा प्रश्न असेल की हा दिवस साजरा का केला जातो? चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिनाचे महत्व आणि आजच्या आधुनिक युगात आपल्या जीवनातील पुस्तकांचे महत्व. विल्यम शेक्सपिअर, इंका गार्सिलोसा यासारख्या काही जगप्रसिद्ध साहित्यिकांचे निधन २३ एप्रिल याच दिवशी झाले असल्यामुळे या सर्व दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने २३ एप्रिल हा दिन जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. प्रथमत: २३ एप्रिल १९२३ मध्ये स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी हा दिवस साजरा केला होता. यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये घेण्यात आलेल्या युनेस्कोच्या सर्वसाधारण सभेमध्ये जगभरातील लेखकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.
मित्रहो मानवाने आपल्या जीवनाला उन्नत करण्यासाठी अनेक गोष्टींचा शोध लावला आणि या शोधातून ‘विश्वकल्याण’ करण्याचा प्रयत्न केला. अशाच शोधांपैकी पुस्तक निर्मितीचा शोध देखील महत्वपूर्ण आहे. आज आपण सर्व पुस्तकांचे जे स्वरूप पाहत आहोत त्यामागे खूप मोठा इतिहास लपलेला आहे. अशा प्रकारची पुस्तक निर्मिती ही सहज शक्य होणारी बाब नाही. ज्याप्रकारे पुस्तकांनी आपल्या संस्कृतीचा, समाजाचा आणि ज्ञानाचा वारसा जपलेला आहे. त्याचप्रकारे पुस्तकनिर्मिती मागेदेखील असाच इतिहास लपलेला आहे. पुस्तकांचे महत्व जाणून घेण्याअगोदर पुस्तक निर्मिती का केली जाते? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. तसेच पुस्तक निर्मितीचे उद्देश देखील महत्वाचे ठरते. सहसा पुस्तक निर्मिती ही ज्ञान व माहितीच्या वृद्धीसाठी आणि संवर्धनासाठी केली जाते. याचाच अर्थ म्हणजे प्राप्तज्ञानाचे जतन करून ते समाजापर्यंत पोहचविणे तसेच त्या ज्ञानाला एका विशिष्ठ स्वरूपात जतन करून येणाऱ्या पिढीसाठी उपलब्ध करण्याकरीता पुस्तकांची निर्मिती केली जाते. पुस्तक निर्मितीचे उद्देश हे त्या-त्या पुस्तकांच्या प्रकारानुसार भिन्न असतात उदा. क्रमिक पुस्तके, संदर्भ पुस्तके आणि शैक्षणिक उपयोगासाठी असणाऱ्या पुस्तकांचा उद्देश हा त्या-त्या विषयाच्या, अभ्यासक्रमाच्या आणि माहितीच्या स्वरूपावर आधारित असतो तर अवांतर वाचनीय साहित्य उदा. कथा, कादंबरी, विनोदी साहित्य, आध्यात्मिक साहित्य आणि धार्मिक साहित्य यांचे उद्देश देखील त्यांच्या स्वरूपानुसार भिन्न असतात. पुस्तक निर्मितीच्या अगोदर सुद्धा ज्ञान व माहिती संवर्धनाचे कार्य केले जात असे. मात्र त्यांचे स्वरूप हे भिन्न होते. प्राचीनकाळी यांसाठी हस्तलिखिते, ताम्रपट, भूर्जपत्र, शिलालेख, प्राण्यांच्या कातडी, माती किंवा विटांवरील लिखाण, हत्तींच्या (अन्य विशाल प्राण्यांच्या) दातांवरील लिखाण आणि कापड अशा संसाधनाचा वापर केला जात असे. कालांतराने मनुष्य अनेक शोध लावत गेला आणि त्यातून पुस्तक निर्मितीचा प्रवास शक्य झाला. पुस्तक निर्मिती प्रक्रिया ही शाईचा शोध, छपाईचा शोध, कागदाचा शोध आणि मुद्रणकलेचा शोध याप्रमुख घटकांवर आधारीत प्रक्रीया आहे. पूर्वी पुस्तक निर्मितीसाठी किंवा छपाईसाठी लाकडी ठोकळा वापरला जात असे. एक मोठ्या लाकडी ठोकळ्यावर अक्षरे कोरून त्यांना शाईमध्ये भिजून कापडावर किंवा झाडांच्या सालीवर उमटविले जात असे जर या ठोकळ्यावर अक्षरे कोरतांना काही चुकले तर पुन्हा नव्याने ती प्रक्रिया करावी लागत असे यामुळे छपाईचे कार्य हे संथ गतीने होत असे. आजच्या आधुनिक युगात पुस्तक निर्मिती प्रकिया आणि तंत्रे हे फार मोठ्या प्रमाणात विकसित झाले झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पुस्तक निर्मिती करणे शक्य होते. आज पुस्तक निर्मितीसाठी, लेखनासाठी, छपाईसाठी, कागद निर्मितीसाठी अनेक नव्या तंत्राचा आणि यंत्रांचा वापर केला जातो. इतकेच नाही तर आजच्या आधुनिक युगात ज्याप्रमाणे पुस्तक निर्मिती तंत्रांमध्ये बदल झाला आहे त्याचप्रमाणे पुस्तकांच्या स्वरूपात देखील बदल झाला आहे. आज पुस्तके संगणक आणि इंटरनेटच्या मदतीने ई-स्वरूपात (PDF किंवा E-BOOK) उपलब्ध होत आहे. इतकेच नव्हे तर ऑडीओ स्वरूपातील पुस्तकांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. ऑडीओ बुक्स मोबाईल अॅप्सचा वापर करून सहज हाताळता येते. पुस्तकांच्या या बदलत्या स्वरूपाचा मुख्य उद्देश हा समाजात ज्ञानवृद्धी करणे, वाचन संस्कृती विकसित करणे तसेच पुस्तकांच्या आणि वाचनाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास घडविणे असा आहे. आजचा युवा हा आधुनिक संसाधनाचा वापर फार मोठ्या प्रमाणात करतांना दिसतो यामुळे पारंपरिक वाचनसाहित्यांकडे त्याचा कल कमी झालेला जाणवतो असे अनेक तज्ञांचे मत आहे. यांसाठी उपाय योजना म्हणून देखील पुस्तकांचे आधुनिक स्वरूप हे मदतीचे ठरते. पुस्तकांच्या पारंपरिक आणि आधुनिक स्वरूपापैकी कोणते स्वरूप अधिक उपयुक्त ठरते? खरतर पुस्तकाचा उपयोग हा विशिष्ठ उद्देश पूर्तीसाठी केला जातो. यामुळे दोन्ही प्रकारातील पुस्तके हे वाचकांच्या गरज, वेळ आणि उद्देशानुरूप उपयुक्त ठरते उदा. जर एखाद्या वाचकाला ठराविक माहिती ही त्वरित आणि अल्पमुदतीसाठी आवश्यक असेल तर असा वाचक आधुनिक स्वरूपातील पुस्तकाचा वापर करून आपल्या माहितीची भूक भागवू शकतात मात्र एखादा वाचक हा दीर्घ मुद्तीसाठी आणि मोठ्या प्रमाणावर माहितीचा शोध घेत असेल तर अशा प्रसंगी पारंपरिक पुस्तकाचे स्वरूप जास्त उपयोगी पडते. पारंपरिक आणि आधुनिक पुस्तकांमध्ये तुलना न करता वाचन आणि वाचकांच्या गरजा लक्षात घेता त्यांचा वापर करणे रास्त ठरते. ऑडीओ पुस्तकाने तर पुस्तकांच्या इतिहासात एक नवक्रांती निर्माण केली आहे. निरक्षर व्यक्ती देखील या माध्यमाने वाचन साहित्यांचा उपयोग करून घेऊ शकतात. इंटरनेटच्या मदतीने ई-पुस्तकांची आणि ऑडीओ पुस्तकांची उपलब्धता सहजपणे होऊ शकते तर पारंपरिक पुस्तके हे ग्रंथालय, वाचनालय, प्रकाशक तसेच खाजगी आणि शासकीय संस्थाच्या माध्यमाने उपलब्ध होतात. राष्ट्र निर्मितीसाठी देखील पुस्तकांचे योगदान खूप मोठे आहे. ‘जो देश आपली संस्कृती, आपला इतिहास जपतो तो देश नेहमीच प्रगती करतो’ म्हणूनच म्हटले जाते. जर संस्कृती टिकेल तर समाज टिकेल आणि समाज टिकला तर राष्ट्र टिकेल आणि याच संस्कृतीला टिकविण्याचे कार्य हे पुस्तकांच्या मार्फत गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. चला तर मग आपण ही ‘ग्रंथ हेची गुरु’ मानून आजच्या या दिनाला प्रण करून ठरवूया की, पुस्तकांचा जास्तीत जास्त वापर करून अधिकाधिक माहिती प्राप्त करुया आणि देशांतर्गत वाचन संस्कृतीचे जतन करुया.
Ref : :https://spreaditnews.com/2022/04/22/day-speacial-world-book-day/