डॉ. एस. आर. रंगनाथन आणि उच्च शिक्षणात ग्रथालयाची भूमिका

डॉ. एस. आर. रंगनाथन आणि उच्च शिक्षणात ग्रथालयाची भूमिका 

दि. ९ ऑगस्ट आज संपूर्ण भारतात ग्रंथपाल दिवस साजरा करण्यात येत आहे. ग्रंथपाल दिवस हा भारताचे  महान ग्रंथपाल, गणितज्ञ  आणि पद्मश्री डॉ.एस. आर रंगनाथन यांच्या यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. डॉ. एस. आर रंगनाथन यांनी केलेल्या कार्यामुळे भारतीय ग्रंथालयशास्त्राला एक नवी दिशा प्राप्त झाली. डॉ रंगनाथन हे गणित या विषयाचे प्राध्यापक  होते. मात्र ग्रंथालय आणि ग्रंथपालन या क्षेत्राकडे निर्माण झालेल्या आवडीमुळे त्यांनी आपले भावी आयुष्य याच क्षेत्रात कार्य केले. डॉ. रंगनाथन यांनी युनेस्को इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ डॉक्युमेंटेशन यांसारख्या आंतरराष्ट्रीय समित्यांवरही आपली कामगिरी केली असून जगातील अनेक  देशांमध्ये त्यांनी ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयांवर मार्गदर्शन देखील केले. डॉ.रंगनाथान हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ग्रंथालय समितीचे अध्यक्ष देखील होते. डॉ.रंगनाथन यांच्या कार्यामुळे १९५७ साली भारत सरकारच्या वतीने पद्मश्रीपुरस्कारने गौरविण्यात आले.

 

डॉ. रंगनाथन यांचे प्रमुख कार्य : ग्रंथालय शास्त्रातील डॉ. रंगनाथन यांनी मांडलेली पंचसूत्रे गेल्या नऊ दशकापेक्षा अधिक काळापासून अगदी तंतोतंत लागू पडतात. इ.स १९३१  मध्ये त्यांनी लिहिलेल्या 'द फाईव्ह लॉज ऑफ लायब्ररी सायन्स' या जगप्रसिद्ध पुस्तकातून या सूत्रांची प्रचीती संपूर्ण जगाला आली. आजही भारतीय ग्रंथालय शास्त्राची कार्यपद्धती या पाच सिद्धांतावर अवलंबून आहे. डॉ. रंगनाथन यांची  पंचसूत्रे पुढील प्रमाणे आहे १. ग्रंथ हे वाचण्यासाठी असतात. २. प्रत्येक वाचकासाठी पुस्तक ३. प्रत्येक पुस्तकासाठी वाचक असतो. ४. ग्रंथपालाचा आणि वाचकाचा वेळ वाचला पाहिजे. ५.ग्रंथालय ही वर्धिष्णू (वाढत जाणारी) संस्था आहे. डॉ. रंगनाथन यांनी शैक्षणिक ग्रंथालयांप्रमाणेच सार्वजनीक ग्रंथालयांच्यां विकासात देखील आपले योगदान दिले. यांसाठी त्यांनी १९२८ मध्ये मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना केली. डॉ. रंगनाथन यांचे कार्ये ग्रंथपाल म्हणून तर उल्लेखनीय तर होतेच परंतु त्यांनी लेखक, शिक्षक, गणितज्ञ म्हणून केलेले कार्य देखील मोलाचे ठरते.

 

उच्च शिक्षणात ग्रंथालयांचे महत्व : ग्रंथालयांनी गेल्या अनेक दशकांपासून समाजाला ज्ञान देण्याचे कार्य केले आहे. प्राचीन काळापासून ग्रंथालयांचे महत्व हे अनन्य साधारण आहे यांचे उदाहरण नालंदा आणि तक्षशिला यांसारख्या विद्यापीठाच्या ग्रंथालयांची भव्यता पाहून लक्षात येते. आधुनिक काळात देखील ग्रंथालयांचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः उच्च शिक्षणात ग्रंथालयांचे महत्व वाढत आहे. याची काही प्रमुख कारणे जाणून घेऊया.

 

शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या ज्ञानासाठी :  शिक्षण घेवून फक्त पदवी प्राप्त करणे इतकाच उद्देश न ठेवता विद्यार्थ्यांचे प्रमुख कर्तव्य हे शिक्षण घेत असलेल्या विषयांचे सखोल ज्ञान प्राप्त करून चांगल्या गुणांनी पदवी संपादन करणे हा असावा आणि यांसाठी गरज भासते ती अधिक ज्ञान संसाधनांची म्हणूनच ग्रंथालयाचा वापर अधिक महत्वाचा ठरतो. ग्रंथालयांमध्ये उपलब्ध असलेल्या पुस्तके, नियतकालिके, संशोधन प्रबंध, वर्तमानपत्रे, ई-पुस्तके, ई-नियतकालिके, डेटाबेसेस, दृकश्राव्य साधनांच्या मदतीने विद्यार्थ्यांना विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होते.   

 

दर्जेदार संशोधन कार्यासाठी : देशाची प्रगती ही त्या देशात होणा-या संशोधनांवर अवलंबून असते. दर्जेदार संशोधन हे अभ्यासाशिवाय आणि माहिती संसाधनांशिवाय होणे शक्य नाही. दर्जेदार संशोधन करणे असल्यास ग्रंथालयांचा वापर करून अधिकाधिक संदर्भ साहित्यांचा वापर करून संशोधनाला योग्य पुरावे, आधार आणि दिशा देणे शक्य होते. आजच्या आधुनिक ग्रंथालयांत अनेक प्रकारच्या ई-संसाधनांची उपलब्धता असल्यामुळे संशोधकांना आपले संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी कुठल्याही भौगोलिक आणि आर्थिक अडचणी उद्भवत नाही. अशी ई-संसाधने इंटरनेटच्या माध्यमाने जगातील कुठल्याही भागातून हाताळता येतात. 

 

अचूक ज्ञानप्राप्तीसाठी : ग्रंथालयात उपलब्ध करून दिलेली संसाधने ही काही विशेष निकषांवर आणि दर्ज्यांवर आधारित असतात. त्यामुळे त्यातील माहिती देखील अचूक आणि दर्जेदार असते. आज आपण सर्व आधुनिक युगात जगत आहोत आज माहिती संसाधनांची खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे इतकेच नव्हे तर माहिती उपलब्ध करून देणाऱ्या अनेक माध्यमांची उपलब्धता इंटरनेटच्या माध्यमाने झाली आहे. आज माहितीप्राप्ती साठी अनेक जन इंटरनेटचा सर्रास वापर करतात आणि आपल्या माहितीची गरज भागवितात. मात्र ही पद्धत योग्य आहे का? त्याची सत्यता किंवा प्रामाणिकता तपासल्या गेल्या आहेत का याचा आपल्यापैकी किती लोक करतात हे सांगणे जरा कठीण आहे.

 

अवांतर ज्ञानासाठी :  प्रत्येक व्यक्तींच्या अंगात कुठला ना कुठला गुण लपलेला असतो या कला गुणांना वाव देण्यासाठी अवांतर वाचन साहित्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अवांतर वाचनातून समाजात चांगले लेखक, कवी, साहित्यिक आणि  विचारवंत निर्माण करता येते.

 

माहिती तज्ञांचे सहकार्य : उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील ग्रंथालयात कार्यरत असलेले किंवा नियुक्त केलेले संचालक, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, माहिती शास्त्रज्ञ हे देखील उच्चशिक्षित आणि संशोधक असतात. यामुळे अशा व्यक्तींच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा उच्चशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना, संशोधकांना तसेच प्राध्यापकांना देखील होऊ शकतो.

 

आधुनिक सेवा आणि सुविधा : अनेकदा हवी असलेली माहिती आपणांस कुठे सापडेल याबद्दल पूर्ण माहिती नसते किंवा एखाद्या विषयाबद्दल कोणती संसाधने ही उपयुक्त करतील याचा अंदाज पूर्णपणे वाचकांना, संशोधकांना किंवा प्राध्यापकांना येत नाही. अशा वेळी ग्रंथालयांचा वापर केल्यास ग्रंथालयांच्या विविध सूची, तालिका संदर्भ सेवा, माहिती सेवा, प्रचलित जागरूकता सेवेच्या माध्यमाने अशी माहिती अचूकरीत्या आणि कमी वेळेत वाचकांना दिल्या जातात व वेळेची बचत होते. आता अशा सेवा आणि सुविधा या ग्रंथालयांमार्फत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देखील उपलब्द करून दिली जाते यांसाठी ग्रंथालयात दर्जेदार आज्ञावली किंवा प्रणालींचा वापर करून ओपॅक सुविधा उपलब्ध करून दिली जाते इतकेच नव्हे वेबपोर्टल, वेबसाईट, समाज माध्यमांचा उपयोग करून देखील अधिकाधिक माहिती उपलब्ध करून देण्यात येते.

 

प्रेरणादायी विचारांसाठी: जगात अनेक अशी व्यक्तीमत्त्वे आहेत ज्यांच्या कार्यातून, चरित्रातून आणि विचारातून येणाऱ्या कित्येक पिढ्या प्रेरणा घेत असतात. ग्रंथालयाच्या माध्यमातून अशा व्यक्तीमत्वांच्या पुस्तकांची व साहित्यांची उपलब्धता ग्रंथालयात पारंपारिक आणि आधुनिक स्वरूपात उपलब्ध करून दिले जातात यांचा उपयोग करून वाचकांना प्रेरणा मिळते.

 

              शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा उंचविण्यासाठी ग्रंथालयांची भूमिका महत्वाची असून संस्थेच्या मूल्यांकनासाठी ग्रंथालय सुसज्ज असणे महत्त्वाचे आहे. अशा कित्येक उदाहरणातून उच्च शिक्षणात ग्रंथालयाची उपयोगिता सिद्ध होते. आज ग्रंथपाल दिनानिमित्त भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन यांना अभिवादन करून एक ग्रंथपाल या नात्याने उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी, संशोधकांनी ग्रंथालयांचा अधिकाधिक वापर करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा उंचवाव्या असे आवाहन करतो.

 

लेख :

हितेश गोपाल ब्रिजवासी

ग्रंथपाल, विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत

के.ए.के.पी संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जळगाव


Artificial Intelligence कुत्रिम बुद्धीमत्ता संदर्भातील काही महत्व पूर्ण लेख

Artificial Intelligence कुत्रिम बुद्धीमत्ता संदर्भातील काही महत्व पूर्ण लेख  

-: प्रासंगिक लेख:- -शिकूया सारे, शिकूया ऑनलाईन: शिक्षक आणि ग्रंथपालांचे सामूहिक प्रयत्न-